मराठा आरक्षण मिळताच मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठा आरक्षण मिळण्यासाठी केंद्राने ५० टक्के राज्यघटनेत असलेली आरक्षण मर्यादा वाढवावी. ती वाढवल्यानंर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देता येणार आहे, तशी महाविकास आघाडी सरकारची तयारी आहे, असे राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत सांगितले.

समाजवादी पक्षाचे सदस्य अबु आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. आपले लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर बॅनर फडकावले. त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना नवाब मलिक म्हणाले, केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवल्याशिवाय सध्या वाढीव आरक्षण देता येणे शक्य नाही. सरकारने केंद्राकडे तशी वारंवार मागणी केली आहे. एकदा आरक्षण मर्यादा उठली की मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचे प्रश्न निकाली निघणार आहेत.यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही. तसा कायदा आंध्र प्रदेशने केला होता. तो न्यायालयाने बाद केला, असे सांगितले. त्यावर मलिक म्हणाले, शिख, बौद्ध, कबिर पंथीय या धर्मियांना तसा अपवाद केला होता,असे निदर्शनास आणले.

Previous articleहिवाळी अधिवेशन : अजितदादांच्या दट्ट्यानंतर मंत्री,आमदारांनी घातले पटापट मास्क
Next articleछगन भुजबळांचा घणाघात : केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्याने ओबीसींचे आरक्षण अडचणीत