नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात वादळी झाली.दोन्ही सभागृहात कामकाज सुरू होताच विरोधकांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नबाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला.या मुद्द्यावर भाजपच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी करीत गदारोळ केला विधानसभेत घोषणाबाजी केली .या गोंधळातच वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ६,२५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहासमोरील सर्व कामकाज बाजूला ठेवून नवाब मलिक यांच्या विषयावर चर्चा करावी अशी मागणी लावून धरली.दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तरी त्यांचा राजीनामा अद्याप घेतला नाही हे राज्याच्या इतिहासात कधीही घडले नाही असा आरोप त्यांनी केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एक मिनिट ही त्यांना पदावर राहू दिले नसते,दाऊदचे समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, हसीना पारकर या दाऊदच्या बहिणीशी व्यवहार करून मलिक यांनी दहशवाद्यांना मदत केली आहे असे ते म्हणाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मात्र हा प्रस्ताव नाकारला,आज भारतरत्न लता मंगेशकर आणि इतर मान्यवरांचा शोकप्रस्ताव असल्याने इतर विषय नको असे सांगत त्यांनी प्रस्तावाला मंजुरी नाकारली आणि पुढील कामकाज पुकारले.त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक होवून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.या गोंधळातच उपाध्यक्ष झिरवाळ यांनी पुढील कामकाज पुकारले.वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ६,२५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, राज्यपालांनी संमत केलेल्या विधेयकांची यादीदेखील सभागृहात वाचून दाखवण्यात आली.

यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीतच उपाध्यक्ष झिरवाळ यांनी भास्कर जाधव,संजय शिरसाट, दीपक चव्हाण,कुणाल पाटील आणि कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी निवड जाहीर केली. उपाध्यक्ष झिरवाळ यांनी नंतर शोक प्रस्ताव पुकारला आणि सभागृह शांत झाले,विरोधक आपापल्या जागेवर जाऊन बसले,स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर,राहुल बजाज यांच्या सह दिवंगत सदस्य नारायण पाटील, गजानन बाबर,नरेंद्रसिंग पाडवी,विश्वासराव पाटील,आशाताई टाले यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त करीत झिरवाळ यांनी सभगृहाच्या वतीने या सर्वांना आदरांजली वाहिली. यानंतर सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.

विधानपरिषदेतही मलिकांच्या राजीनाम्यावरून गोंधळ

विधानपरिषद सभागृहाचे कामकाज सुरू होताच,१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी पुढे येत मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे आणि राज्य सरकार दाऊदचे समर्थक आहे का..? असा प्रश्न उपस्थित करणारे फलक झळकावले.या गदारोळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार दर्शक प्रस्ताव मांडण्यात आला तसेच २०२१-२२ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.सतेज पाटील,चंद्रशेखर बावनकुळे, अमरीश पटेल,राजहंस सिंह, सुनिल शिंदे, वसंत खंडेलवाल या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय संसंदीय कामकाजमंत्री मंत्री अनिल परब यांनी सभागृहाला करून दिला.त्यानंतर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर,उद्योगपती राहुल बजाज यांच्या सह विधनपरिषद सदस्य आर. एस. सिंह, माजी मंत्री आणि माजी विधानपरिषद सदस्य नारायण पाटील,सुधीर जोशी त्याचप्रमाणे दत्तात्रय लंके,संजीवनी रायकर,आशाताई टाले,कुमुद रांगणेकर या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दचा शोकप्रस्ताव सभागृहाने मंजूर केला या दरम्यान ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षांने विधानपरिषदेत गदारोळ करत सभात्याग केला.

Previous articleअखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला लावली हजेरी
Next articleएसटी कर्मचा-यांनो १० मार्चपर्यंत कामावर हजर व्हा ! अन्यथा कंत्राटी पद्धतीने भरती