अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला लावली हजेरी

मुंबई नगरी टीम

मुंबई । मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या तीन महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमास अनुपस्थित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापान कार्यक्रमालाही उपस्थित राहिले नसल्याने ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आज सकाळी त्यांनी विधानभवनात हजेरी लावत कामकाजात सहभाग घेतला.

मानेचा आजार बळावल्याने १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच.एन.रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आरामाची गरज असल्याने त्यांनी गेली तीन महिने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती.गेले हिवाळी अधिवेशन हे पाच दिवसाचे होते.त्या अधिवेशनालाही ते उपस्थित राहिले नव्हते.मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे अनेक महत्वाच्या कामकाजात भाग घेतला तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला हजर होते.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित नव्हते.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ते उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा होती.मात्र मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळी अकराच्या सुमारास अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या ताफ्यासहीत दाखल झाले.यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गाडीचे सारथ्य त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत होते.आदित्य ठाकरे यांना गाडी चालवताना पाहून उपस्थित प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकांनी ही झलक कॅमेरात टीपण्यासाठी एकच गर्दी केली.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज्यपालांच्या अभिभाषणाला हजेरी लावत विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली नाही.मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने ठाकले आहेत.भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेले आरोप यावरून सभागृहात गोधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने विरोधकांचे हल्ले परतावून लावतानाच मुख्यमंत्री ठाकरे हे विरोधकांचा कोणत्या शब्दात उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांची सरकारवर जहरी टीका
Next articleनवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ