ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांची सरकारवर जहरी टीका

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत,अशी भूमिका भाजपाची आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुरुवातीपासून बेपर्वाई व ढिलाई केली.मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्यानंतरही हे सरकार जागे झाले नाही.त्यानंतर जरी तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई केली असती व एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर ओबीसींना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण परत मिळाले असते. महाविकास आघाडी सरकार सदैव टाळाटाळ करत राहिले.आताही सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना सादर केलेला अहवाल कच्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे असेही पाटील म्हणाले.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार ढिलाई आणि वेळकाढूपणा करत राहिले आहे. भाजपा हे मान्य करणार नाही. आघाडी सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार कारवाई करून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले पाहिजे. हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleनवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा एल्गार सुरुच राहणार;दरेकरांचा इशारा
Next articleअखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला लावली हजेरी