शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून घेतले तर मंत्रालयात दोन तरूणांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विधानसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधीपक्ष आक्रमक झाला असतानाच विधानभवनाबाहेर उस्मानाबाद जिल्ह्यातील सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरूणांनी मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

विधानसभेत अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे झालेल्या नुकसानीवरून विरोधी पक्षांचे आमदार आक्रमक होवून शेतक-यांना मदतीची मागणी करीत असताना दुसरीकडे विधानभवाच्या बाहेर उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.जमिनीच्या वादातून देशमुख यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान,पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.पोलिसांनी देशमुख यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले असून त्यांचा हात भाजला आहे.जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख यांच्या वडिलांनीही जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ते यात वाचले. सुभाष देशमुख यांनी जाळून घेतल्याने ते १२-२० टक्के भाजले असल्याची माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, जो काही विषय असेल त्यात लक्ष घालून सोडवला जाईल,याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

दुसरीकडे सायंकाळच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरूणांनी मंत्रालयाच्या छतावर जावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.दोन तरूणांनी मंत्रालयाच्या छतावर धाव घेत मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.मात्र, पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुपपणे खाली उतरवले.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.दोन ते तीन जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या छतावर चढले होते.त्यांना खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.अधिवेशन सुरू असतानाच आजच्या या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा आहे.

Previous articleअरे थांब ना बाबा…..आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? अजितदादा भडकले
Next articleईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी…आले रे आले गद्दार आले ! विरोधकांची घोषणाबाजी