मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट! भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बडे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जावून भेटी घेत आहेत.त्यातच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीगाठी घेत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,विनोद तावडे,आमदार आशिष शेलार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थवर जावून राज ठाकरे यांची भेट घेवून सुमारे पाऊण तास चर्चा केली.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला महत्व आले असतानाच आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो.त्यामुळे मी राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मध्यंतरी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली होती.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होते.या भेटीत कोणतीही राजकीय चर्चाच झाली नाही.त्यामुळे कोणती समीकरणे यातून निघणार ? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.आनंद दिघे यांच्या आठवणी देखील चर्चेतून निघाल्या.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेबांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केले आहे.असे ते म्हणाले.सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारे हे सरकार आहे.कमी वेळेत महत्वाची कामे करायची आहेत.राज्यात एक मजबूत सरकार स्थापन झाले आहे.त्यापाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Previous articleउद्धव ठाकरे यांनी विरोध केलेला प्रकल्प मार्गी लागण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
Next articleशिंदे सरकारचे गिफ्ट : पोलिसांना मिळणार खात्यांतर्गत २० लाखापर्यंतचे कर्ज