शिंदे सरकारचे गिफ्ट : पोलिसांना मिळणार खात्यांतर्गत २० लाखापर्यंतचे कर्ज

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील पोलीस कॉन्स्टेबल दर्जाच्या कर्मचाऱ्यांना आता पूर्वी प्रमाणे खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.ही योजना ठाकरे सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती.गेल्या काही दिवसात राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने राज्यातील पोलीस खात्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.सरकारने ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेवून राज्यातील पोलीस कर्मचा-यांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना १५ लाखामध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ यांनी केली आहे.यापूर्वी पोलीसांना खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत होते.मात्र गेल्या सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती.ही योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार आता पोलीस कॉन्स्टेबल दर्जाच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.पोलीस महासंचालक कर्ज खात्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी दिली.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट! भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री ?
Next articleउद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांच्या नावावर मतं मागितली आणि जिंकून आल्यावर विश्वासघात केला