समतेच्या विचारातूनच पुरोगामित्त्व साधता येईल : देवेंद्र फडणवीस
मुंबई नगरी टीम
मुंबई : समताधिष्ठीत समाजनिर्मिती म्हणूनच आरक्षणाच्या व्यवस्थेकडे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. केवळ उपकरण म्हणून त्याकडे पाहिले तर अंतिम साध्य अजून आपण गाठू शकलेलो नाही. समतायुक्त समाज निर्मितीसाठी हे सभागृह सदैव कटिबद्ध राहील आणि समतेच्या विचारातूनच खर्या अर्थाने आपल्याला पुरोगामित्त्व साधता येईल, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
भारतीय संविधानाच्या १२६ व्या सुधारणा विधेयकाच्या अनुसमर्थनार्थ विधानसभेत पारित करण्यात आलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका आज सभागृहात मांडली. ते म्हणाले की, लोकशाही ही केवळ गुणवत्तात्मक किंवा संख्यात्मक अशी असू शकत नाही. ती प्रातिनिधीक स्वरूपाची सुद्धा असली पाहिजे, अशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम आणि अतिशय सुयोग्य अशी भूमिका होती. संविधान हे केवळ सशक्तीकरणाचे भक्कम माध्यम नाही, तर ते सामाजिक न्यायाचे सुद्धा भक्कम दस्तावेज आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, सात दशके आरक्षणाचे धोरण आपण स्वीकारले आणि त्याचा लाभ सुद्धा होताना दिसून येतो. समानता म्हणजे संधी प्रदान करणे. संधीची समानता हीच आपल्या संविधानाची रचना आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आणि हा वारसा अनेकांनी पुढे चालविला. अनेक जाती अशा आहेत, ज्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष आरक्षणाचे लाभ अजूनही पोहोचलेले नाहीत. अनेक जाती अशा आहेत, ज्यांना या सभागृहात अजून येण्याची एकही संधी मिळाली नाही. म्हणूनच आरक्षणाला मुदतवाढ देण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यासाठी पुढाकार घेतला आणि पुढचे १० वर्ष ही व्यवस्था कायम ठेवण्याची भूमिका घेतली. जोवर संपूर्ण उद्दिष्ट साध्य होत नाही, तोवर पुढचा कितीही काळ लागला तरी ही व्यवस्था आपल्याला कायम ठेवली पाहिजे.