मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मुदतवाढ देणारा ठराव मंजूर

मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मुदतवाढ देणारा ठराव मंजूर

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या आज झालेल्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये राखीव जागा ठेवण्यास तसेच अँग्लो इंडियन समाजास नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्यास पुढील १० वर्षासाठी मुदतवाढ देणारे संसदेने मंजूर केलेले संविधान (एकशे सव्वीसावी सुधारणा) विधेयक, २०१९ या विधेयकाच्या अनुसमर्थनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी आज विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते.अधिवेशनाची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांची सभागृहाला ओळख करून दिली.त्याप्रसंगी ठराव मांडताना विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशात पुढारलेले राज्य असून देशाला नेहमीच नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक साधुसंतांनी सामाजिक एकतेसाठी, समानतेसाठी काम केले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी सर्व समाजघटकांना न्याय मिळावा यासाठी भूमिका घेतली आहे.

अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीतील समाज आजही खडतर परिस्थितीचा सामना करत असल्याचे आपण पाहतो.त्यांचे हक्क त्यांना मिळणे गरजेचे आहे. समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे गरजेचे आहे. हे विधेयक समाजातील सर्व स्तरांना समान संधी देणारे असून सामाजिक न्यायाचा भक्कम पाया आहे. त्यामुळे संविधानातील या तरतुदीला मुदतवाढ देताना विशेष आनंद होत आहे. विधेयक मंजूर केल्यामुळे भारतीय संसदेचेही अभिनंदन करतो.विधेयकास अनुसमर्थन देण्याबाबतचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मांडला.त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन व पाठिंबा दिला.संसदेने संमत केलेल्या संविधान (एकशे सव्वीसावी सुधारणा) विधेयकाद्वारे प्रस्तावित केलेल्या, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३६८ च्या खंड (२) मधील परंतुकाच्या खंड (घ) च्या कक्षेत येणाऱ्या सुधारणेचे अनुसमर्थन करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.माजी सदस्य चुन्नीलालभाऊ गोपालभाऊ ठाकूर, अमृतराव वामनराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी शोकभावना व्यक्त केल्या आणि सभागृहात श्रद्धांजली वाहिली.

Previous articleएकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री
Next articleसमतेच्या विचारातूनच पुरोगामित्त्व साधता येईल : देवेंद्र फडणवीस