नेहरु व कॉंग्रेसचा आरक्षणला विरोध होता : प्रविण दरेकर
मुंबई नगरी टीम
मुंबई : अनुसुचित जाती व जमातीच्या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्याच्या घटना दुरुस्तीला समर्थन देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज काँग्रेसच्या आरक्षण विरोधाच्या भूमिकेवर टिकेची झोड उठविली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु व त्यांच्या काँग्रेसने आरक्षणाला विरोध केला होता. काँग्रेसने दोन वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूकीतही पराभूत केले होते, असा जोरदार हल्ला त्यांनी आपल्या भाषणात केला. विरोधी पक्ष नेत्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ माजला व सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी २७ जून १९६१ रोजी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राचा दाखला यावेळी दिला. या पत्रामध्ये नेहरु यांनी आरक्षणाच्या विरोधात भुमिका घेतली होती. संविधान सभेमध्ये नेहरु आणि काँग्रेसची भुमिका आरक्षण विरोधातील होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भुमिका स्पष्ट करताना नमुद केले की, सरकार हे कार्यक्षम तर असलेच पाहिजे पण ते प्रातिनिधिक ही असलेच पाहिजे, असा उल्लेखही केला होता. हा संदर्भ १९४९ च्या कॉन्स्टीटयुशन असेम्बली डिबेट ऑन रिझरवेशन पॉलीसी याध्ये आढळून येतो. हा उल्लेख केल्यानंतर विधान परिषदेतील कॉग्रेसच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कॉग्रेसच्या विरोधात टिका करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूकीमध्ये पराभूत करण्याचे काम कॉग्रेसनेच केले होते, असा जोरदार आरोप केला.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काही वृत्तपंत्रांचे तसेच त्यावेळी झालेल्या सभांमधील इतिवृत्तांचे दाखले दिले आणि नेहरुंची भुमिका ही आरक्षणाच्या विरोधात होती अस ठामपणे नमुद केले.