डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार : अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार : अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे.या स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी पुनरूच्चार केला. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या या प्रत्येक विभागाच्या सचिवांनी ८ दिवसात पूर्ण करायच्या आहेत असे आदेशही दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.येत्या २१ जानेवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार इंदू मिलला भेट देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल, ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. तसेच या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल, अशी माहितीही पवार यांनी दिली.मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले.या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे.

Previous articleसतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री
Next articleआता नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत