अवकाळीग्रस्त शेतक-यांना २३ हजार कोटींची मदत द्या : फडणवीस

अवकाळीग्रस्त शेतक-यांना २३ हजार कोटींची मदत द्या : फडणवीस

मुंबई नगरी टीम

नागपूर : सरकारमध्ये असणा-या पक्षांच्या जाहिरनाम्यात आणि किमान समान कार्यक्रमात शेतक-यांना कर्जमाफी देण्यासह त्यांचा सात बारा कोरा करणार असल्याच्या मुद्द्याचा समावेश होता. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी आणि त्यांचा सात बारा करण्याची मागणी त्यांनी केली होती. याची आठवण सरकारला उद्यापासून सुरू होणा-या अधिवेशनात करून देणार असल्याचा इशारा देतानाच अवकाळीग्रस्त शेतक-यांना २३ हजार कोटींची तातडीने मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून,स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे स्पष्ट केले.

उद्यापासून नागपूर येथे सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षाची भूमिका मांडली.उद्यापासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन सत्ताधा-यांनी गांभिर्याने घेतलेले नाही. त्यांचा केवळ वेळकाढूपणा चालू असून,राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अवकाळीग्रस्त शेतक-यांना मदत करेल अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत कसलाही निर्णय घेण्यात आला नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट २५ हेक्टरी तर बागायत शेतक-यांना ५० हजारांची मदत देण्याची मागणी तेव्हा केली होती.राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका झाल्या मात्र शेतक-यांना मदत देण्यावर साधी चर्चाही करण्यात आली नाही अशी टीका फडणवीस यांनी करून शेतक-यांना २३ हजार कोटींची मदत देण्यात यावी अशी मागणी केली.सरकारला याचीच आठवण अधिवेशनात करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सरकार येवून काही दिवस झाले आहेत. शपथविधी झाला पण पूर्ण खातेवाटप आणि विस्तार झाला नाही.तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्यामध्ये विसंवाद आहे.उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे मात्र मंत्रीच नसल्याने प्रश्न कोणापुढे मांडायचे असा प्रश्न पडला आहे असे सांगतानाच हे सरकार कसे चालेल यावर विरोधी पक्षनेते फडणवीस प्रश्नचिन्ह निर्माण केले.राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार असल्याचा टोला लगावतानाच आज संपूर्ण महाराष्ट्र जवळ जवळ ठप्प असून,राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याने असंतोषाचे वातावरण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.सरकारने आढावा जरूर घ्यावा मात्र स्थगितीमुळे गुंतवणूकीवर परिणाम होत असल्याने त्यांनी तात्काळ कामे सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असताना जाणीवपुर्वक हात वर करता यावे म्हणून आर्थिक स्थितीचे कारण सांगून दिशाभूल करणा-या बातम्या पसरविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जाचा आकडा फुगवून सांगितला जात असल्याचा आरोप करतानाच युतीच्या सरकारमध्ये असताना मंत्रिमंडळातील निर्णय हे एकमताने घेण्यात आले. त्याला शिवसेनेने कधीही विरोध केला नाही. त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे करायचे असेल तर याला शिवसेनाही जबाबदार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार हे शिवसेनेने ठरवावे असे फडणवीस यांनी सांगून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वक्तव्य करणा-या राहुल गांधी यांना सावरकरांच्या बलिदानाची गाथा त्यांना माहित नाही.गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही असा टोलाही लगावला.सरकारमध्ये मंत्री नाहीत,हे सरकार स्थगिती सरकार असून,सावरकरांचा अपमान करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांच्या चहापान मध्ये रस नसल्याचे सांगून सरकारच्या चहापान कार्यक्रमाला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या !
Next articleशेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला कोडींत पकडणार