शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला कोडींत पकडणार  

शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला कोडींत पकडणार ! 


मुंबई नगरी टीम

 नागपूर : राज्यात सत्तातर झाल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन शेतक-यांच्या प्रश्नावर गाजण्याची शक्यता आहे.उद्यापासून नागपूर येथे सुरू होणा-या हिवाळी अघिवेशनात आरेतील मेट्रो कारशेडसह राज्यातील विविध प्रकल्पांना देण्यात आलेली स्थगिती, शेतकरी मदत, कर्जमाफी आदी मुद्दे उपस्थित करून विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून नागपूर येथे सुरूवात होत आहे. मुंबईतील तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेल्यानंतर नागपूर येथील अधिवेशन म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची पहिली परिक्षा ठरणार आहे. अवकाळी पाऊस व जुलै,आँगस्ट महिन्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे.  मात्र,  विरोधकांचे डावपेच उधळून लावण्यासाठी सरकारकडून या अधिवेशनात शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या तोंडावर  ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळात सहा कँबिनेट मंत्री आहेत. या सहा मंत्र्यांवर भीस्त ठेवून ठाकरे प्रथमच अधिवेशनाला सामोरे जात आहेत. पहिल्याच अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनिती आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मेट्रोरेल प्रकल्पाच्या आरेतील कारशेड तसेच नगरविकास आणि ग्रमविकास विभागाच्या निधीतील कामांना स्थगिती दिली आहे.  याशिवाय कारशेडसाठी पर्यायी जागा तसेच आरेतील वृक्ष कत्तलीच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली. या निर्णयावरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मदत आणि कर्जमाफी मुद्यावरून सरकारला विरोधकांच्या तोफखान्यासमोर उभे रहावे लागणार आहे.

राज्यात आँक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी शिवसेनेने शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने आधीच्याच निकषाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामुळे विरोधी पक्ष २५ हजाराच्या मदतीचा मुद्दा उचलून धरणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या तात्पुरत्या खातेवाटपात ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन विभागाशिवाय कोणतेही खाते ठेवले नाही. त्यामुळे सभागृहात उपस्थित  होणाऱ्या बहुतांश मुद्यांना कँबिनेट मंत्री उत्तर देतील. तथापि, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात ठाकरे आपला ‘रोडमँप’ दोन्ही सभागृहासमोर मांडू शकतात.नागपूर अधिवेशनात तारांकीत प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. प्रश्नोत्तरे नसलेले  हे बहुधा पहिलेच अधिवेशन ठरणार आहे.

Previous articleअवकाळीग्रस्त शेतक-यांना २३ हजार कोटींची मदत द्या : फडणवीस
Next articleविरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार