विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

मुंबई नगरी टीम

नागपूर : मुंबईतील आरे मेट्रो कारशेड व्यतिरिक्त राज्यातल्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले,शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असे सांगतानाच नुकताच मंजूर करण्यात आलेला नागरिकत्व कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे,अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

नागपूरातील रामगिरी निवासस्थानी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्यातील विकासकामांना दिलेली स्थगिती आणि अवकाळीग्रस्त शेतकरी नुकसानीपासून वंचित असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत.आमचे मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला.आरे मेट्रो कारशेड व्यतिरिक्त राज्यातल्या कोणत्याही विकासकामाला स्थगिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशन सहा दिवसांचे असले तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.राज्यातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे, तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून,शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री ठाकरे स्पष्ट केले.एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमान आहे.पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून,आम्हाला सावरकरांच्या मु्द्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये  असा इशारा देतानाच नुकताच मंजूर करण्यात आलेला नागरिकत्व कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे,अशी चपराक त्यांनी लगावली.सावरकरांच्या मुद्द्यावर अडचणीत आणणाऱ्यांच्या नितीबद्दल शंका वाटते,असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.देशभरात उफाळलेल्या हिंसाचाराचे काय? असा सवाल करून, छत्रपती शिवाजी स्मारकात कुणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleशेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला कोडींत पकडणार  
Next articleपहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक