सत्तेने शिवसेनेचे तोंड बंद केले : देवेंद्र फडणवीस
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही ठावूक नाही, असा प्रश्न उपस्थित करून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकावर निशाणा साधला.केवळ खुर्चीसाठी देशात आग लावण्याचे काम विरोधक करीत आहेत असे काल पर्यंत शिवसेना म्हणत होती. पण सत्तेने आज त्यांचे तोंड बंद केले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
भाजपच्यावतीने आज ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली.यावेळी झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली.लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगी पोलीसांनी नाकारली.यावरून त्यांनी सरकारवर तोफ डागली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल तर मला टिळकांनी जो प्रश्न विचारला तो विचारावाच लागेल की या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? दगडफेक करणाऱ्यांना परवानगी आणि शांततेने मोर्चा काढणाऱ्यांना परवानगी नाही असा सवाल त्यांनी करून केवळ खुर्चीसाठी देशात आग लावण्याचे काम विरोधक करीत आहेत.कालपर्यंत शिवसेना सुद्धा हेच म्हणत होती. पण सत्तेने आज त्यांचे तोंड बंद केले अशी टीका त्यांनी केली.संकुचित मानसिकतेचे लोक सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आहेत.बौद्ध, जैन, अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतील, तर ते हा भारत सहन करणार नाही.कुणाची नागरिकता काढून घेणारा नाही तर नागरिकता देणारा हा कायदा आहे.विरोध करण्यापूर्वी एकदा कायदा तरी वाचा असेही फडणवीस म्हणाले.
आम्हाला सत्तेचा मोह नाही.सत्तेला लाथ मारावी लागली तरी चालेल, पण देश टिकला पाहिजे,वीर सावरकर आणि हिंदुत्वाची कबर कुणी खोदू शकत नाही.आम्ही कुणावर आक्रमण केले नाही, पण कुणी आमच्यावर आक्रमण केले, तर आम्ही गप्प राहणार नाही असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.कोणत्याही धर्माच्या लोकांना आपल्या देशात जागा देऊन,त्यांच्या धर्माचा सन्मान करणारा भारत हा एकमेव देश आहे याचा तुम्हाला पडला का ? असाही सवाल फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला. पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का असाही प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.