अवैध व विना परवाने फलक लावणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई

अवैध व विना परवाने फलक लावणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई

मुंबई नगरी टीम

मुंबई : केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व अमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत महानगरपालिकेने जाहिरात फलक धोरण आखावे.तसेच अवैध व विना परवाने फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी स्वतः संवाद साधू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. मुंबईतील पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनास देखिल त्यांनी भेट दिली.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सहायक आयुक्तांशी संवाद साधला. नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे, आमदारआदित्य ठाकरे,अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी,पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम करावे. यासाठी मुंबईत असलेल्या विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा.मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जाहिरात फलक धोरण आखावे.तसेच अवैध व विना परवाने फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी स्वतः संवाद साधू, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शहरामध्ये जागोजागी डेब्रिज, कचरा टाकणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी. तसेच डेब्रिज, कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा, यासाठी मुंबई डेब्रिजमुक्त व कचरा मुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. तसेच वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करणे, पदपाथ सुव्यवस्थित राखणे, रेलिंग व्यवस्थित ठेवणे, स्थानिक वातावरणात टिकणारी व फुलणारी झाडे लावणे आदी कामांना प्राधान्य द्यावे. तसेच सेवा मार्गावरील भिंती सुशोभित करण्यासाठी मुंबईतील जागतिक दर्जाच्या कलाकारांची मदत घ्यावी. मुंबईतील ५२ पैकी ५० मंडईच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन मंडईचा विकास करण्यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे. या सर्व कामांच्या आढाव्यासाठी दर तीन महिन्यांनी सहायक आयुक्तांची बैठक घेण्यात येईल.तसेच चांगले काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा या बैठकीत सत्कार करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.मुंबई विकास नियमावलीनुसार विकास होतो की नाही, याकडेही लक्ष देण्यात यावे. विकास हा सर्वांगिण असायला हवा. रस्ते, पदपथ याबरोबरच सेवामार्गावरील हरित पट्टा, उड्डाणपुलाखालील जुनी वाहने काढून तेथील जागांचे सौंदर्यीकरण याकडेही लक्ष द्यायला हवे. नागरिकांना सोयीबरोबरच चांगल्या सुविधा दिल्या तर त्याचा वापर वाढतो. त्यामुळे चांगले पदपाथ दिले तर त्याचा वापर नक्कीच वाढेल. तसेच मुंबईच्या लौकिकात भर पडून मुंबई पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही, यासाठी नाले, पदपथ, गटारे यांची स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच महानगरपालिकेला येणाऱ्या अडचणी राज्य शासनाच्या निर्देशनास आणल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत असे प्रयत्न आहेत. यासाठी महापालिकेने ब्लुमर्ग फिलाँन्थापीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने रस्ते पुनर्रचनेसाठी एक स्पर्धा घेतली. त्यातून पाच रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आली. या आराखड्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.’मुंबई स्ट्रिट लॅब” या स्पर्धेत रस्त्यांची संरचना-संकल्पनेशी निगडीत संरचनाकार-विशारदांनी सहभाग घेतला. यात ५२ संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यातून 15 संघांची निवड करण्यात आली. या संघाना शहरातील पाच रस्त्यांच्या पुनर्रचनेसाठी संकल्पना सादर करण्याचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम देण्यात आले. या स्पर्धेतून हे रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले. यात केवळ पाच रस्त्यांवरील सुमारे सत्तर हजार चौरस फूट जागा कोणतेही मोठे फेरबदल न करता मोकळी करण्यात यश आल्याची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली.

Previous articleविखे पिता पुत्रांवर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही
Next articleसत्तेने शिवसेनेचे तोंड बंद केले : देवेंद्र फडणवीस