या कारणास्त खाते वाटप रखडले !
मुंबई नगरी टीम
मुंबई : सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खाते वाटप केले जाणार अशी चर्चा होती.मात्र खाते वाटप दोन दिवासात केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने आज खाते वाटप केले जाण्याची शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या खाते वाटपाचा तिढा कायम असल्याने खाते वाटप उद्या बुधवारी जाहीर केले जाईल अशी चर्चा आहे.
ठाकरे सरकारच्या काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारांनतर राज्य मंत्रिमंडळाची संख्या ४३ वर गेली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह ३३ जण कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले आहेत.मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे विस्तारानंतर खाते वाटप केले जाण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात हे खाते वाटप पूर्ण केले जाईल असे स्पष्ट केले.काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यावर अंतिम निर्णय झाल्याची चर्चा असली तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या खात्यापैकी कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर एकमत न झाल्याने खाते वाटप लांबले असल्याचे समजते.अजित पवार यांनी गृह खाते घेण्यास नकार दिल्यानंतर शरद पवार यांच्या जवळचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हे खाते देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते.मात्र गृह खाते अनिल देशमुख यांच्याकडे देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार खाते देण्यासाची तयारी काही नेत्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खाते देण्याबाबतही राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह आहे.धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय तर छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना राज्य उत्पादन शुल्क खाते देण्याच्या हालचालीमुळे अनेक जण संभ्रमात आहेत.हसन मुश्रीफ यांना ग्रामविकास खाते,जयंत पाटील यांना जलसंधारण तर बाळासाहेब पाटील यांना सहकार खाते देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीतील खाते वाटपाचा तिढा सुटल्यानंतर उद्या बुधवारी सांयकाळपर्यंत ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले जाईल अशी चर्चा आहे.