मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या काही महिन्यात राज्यसभेच्या ७ तर विधानपरिषदेच्या तब्बल २२ जागा रिक्त होणार आहे.येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ७ जागांची मुदत संपत आहे.राज्यपाल नियुक्त १०,विधानसभा सदस्यांद्वारा निवडुन द्यावयाच्या एकूण ७, शिक्षक मतदार संघाच्या २ आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण ३ सदस्यांची मुदत संपत असल्याने विधानपरिषदेच्या एकूण २२ जागा एप्रिल जून आणि जुलै महिन्यामध्ये रिक्त होणार आहेत.
येत्या एप्रिल,जून आणि जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत.येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या एकूण ७ जागा रिक्त होत आहेत.हुसेन दलवाई (काँग्रेस),अमर साबळे (भाजप ),संजय काकडे (भाजप),रामदास आठवले( भाजप पुरस्कृत),राजकुमार धुत ( शिवसेना ),शरद पवार (राष्ट्रवादी),माजिद मेनन (राष्ट्रवादी) या सदस्यांची मुदत संपत आहे.यावेळी भाजपकडून साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना संधी दिली जाण्याची संधी आहे.राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर विधानपरिषदेच्या रिक्त होणा-या एकूण १२ जागांसाठी निवड़णुक होणार आहे.त्यामध्ये विधानसभा सदस्यांद्वारे निवडुन दिलेल्या चंद्रकांत रघुवंशी,हरिभाऊ राठोड ( काँग्रेस), हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर ( राष्ट्रवादी) स्मिता वाघ ( भाजप), नीलम गो-हे (शिवसेना) हे सात विधानपरिषद सदस्यांची मुदत एप्रिल मध्ये संपत आहे.
हुस्नबानू खलिफे,अनंत गाडगीळ,जनार्दन चांदुरकर,आनंदराव पाटील (काँग्रेस),प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण ख्वाजा बेग,रामराव वडकुते, जगन्नाथ शिंदे ( राष्ट्रवादी) आणि जोगेंद्र कवाडे ( पीआरपी) या १० राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत जून महिन्यात संपत आहे.त्यामध्ये राहुल नार्वेकर हे विधानसभेवर निवडुन गेल्याने तर रामहरी रूपनवर यांनी राजीनामा दिल्याने दोन जागा रिक्त आहेत.या जागी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे.जुलै महिन्यात शिक्षक मतदार संघाच्या २ जागा रिक्त होत आहे.अमरावती शिक्षक विभागाचे अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागाचे अपक्ष आमदार दत्तात्रय सावंत यांची मुदत २ जूलै रोजी संपत आहे.त्याच बरोबर औरंगाबाद पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या एकूण ३ जागा रिक्त होत आहे.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण ( राष्ट्रवादी) आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील आमदार अनिल सोले ( भाजप ) यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची निवड विधानसभेवर झाल्याने हि जागा रिक्त आहे.