महिलांवरील अत्याचार आणि शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार : फडणवीस

मुंबई नगरी टीम
मुंबई : उद्या सोमवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.राज्यातील सरकारने शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती.मात्र सरकारकडून शेतक-यांची फसवणूक करण्याचेच काम करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांवरील अत्याचार आणि शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विरोधी पक्षांशी संवाद साधण्यासाठी सरकारकडून चहापानाचे आयोजन केले जाते मात्र सरकारमधील तिन्ही पक्षांमध्येच विसंवाद असल्याने सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याची घोषणा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.

सोमवारपासून सुरू होणा-या विधिमंडळाच्या अर्थसंपल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष आणि मित्र पक्षांच्या आमदारांच्या बैठक आज पार पडली.या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,राधाकृष्ण विखे पाटील आदी भाजपाचे आणि मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते.अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महत्वाचे असून,विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या चार महिन्यातील सरकारची कामगिरी पाहता त्यांना अजून सुर सापडला नसून,हे गोंधळलेले सरकार आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला.तिन्ही पक्षांनी दिलेली आश्वासने पूर्ण होताना दिसत नाही.केवळ घूमजाव करण्याचे कामच चालू आहे. शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन या सरकारने दिले.मात्र शेतक-यांना एकही पैसा मिळाला नाही अशी टीका त्यांनी केली.शेतक-यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती देवू अशी घोषणा सरकारने केली. पण पीक कर्जमाफी शिवाय शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नसल्याने सरकारने शेतक-यांची फसवणूक करण्याचेच काम केल्याचे टीकास्त्र फडणवीस यांनी यावेळी सोडले.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत त्यांनी दिले.

राज्यात महिल्यांवरील वाढते अत्याचार, शेतक-यांचे प्रश्न प्रामुख्याने अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगत, राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार गंभीर बाब आहे.याचे राजकारण आम्ही करणार नाही पण दर दोन दिवसांनी अशा घटना घडत आहेत.यासंदर्भात सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सरकारच्या माध्यामातून पोलीसांचे राजकारण सुरू असून,पोलीसांचे मनोधर्य खच्ची होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.या सरकारने केवळ विविध योजनांना स्थगिती देण्याचेच काम केले आहे अशी टीका करतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यावेळी अभिनंदनही केले.नागरिकत्व सुधारणा कायद्याचे केलेले समर्थन आणि भीमा कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांना दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्यावरून शिवसेनेचा समाचार घेतला.मध्यप्रदेशात घडलेल्या घटनेनंतर अवाक्षरही काढण्यास शिवसेना तयार नाही हे दुर्दैव आहे.केवळ खुर्चीसाठी विचार सोडणे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सावरकर प्रकरणीही शिवसेना काही बोलत नाही.हे दुर्दैव असून,येत्या २६ फेब्रूवारीला सावरकरांचा गौरव विधानमंडळात झाला पाहिजे अशी मागणी करून यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.आमच्या सरकारच्या कार्यकाळातील कोणत्याही योजनांची चौकशी करायची असेल तर ती करावी त्याला आम्ही घाबरत नाही असे सांगतानाच केवळ जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचे काम सरकारकडून होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.या अधिवेशनात महिलांवरील अत्याचार आणि शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleअखेर महापोर्टल बंद; फडणवीसांच्या निर्णयाला ठाकरे सरकारचा दणका
Next articleराज्यात पुन्हा महाविद्यालयीन निवडणुका व्हाव्यात : शरद पवार