मुंबई नगरी टीम
मुंबई : “आज वो हुए मशहूर जो कभी काबिल ना थे,मंज़िले उनको मिली जो दौड़ में शामिल ना थे” या शायरीच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.आज शेतक-यांचा आवाज बुलंद करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांनी केले. हे नवीन सरकार कसे आहे? असे सांगत त्यांनी वरील शेर सुनावला.
शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर हजारो भाजपा कार्यकर्त्यांसमवेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. राज्यात ४०० ठिकाणी आज अशी आंदोलने झाली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज शेतकर्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांनी केले. हे नवीन सरकार कसे आहे?
“आज वो हुए मशहूर जो कभी काबिल ना थे”
“मंज़िले उनको मिली जो दौड़ में शामिल ना थे”
शिवसेनेने भाजपाचा तर विश्वासघात केलाच. पण, आता किमान शेतकर्यांचा विश्वासघात त्यांनी करू नये. अवकाळीग्रस्त शेतक-यांना मदत करू अशा मोठमोठ्या घोषणा नेत्यांनी केल्या.पण, आज केवळ माघारी फिरण्यापलिकडे काहीही होताना दिसत नाही. कर्जमाफीची जी पहिली यादी जाहीर झाली त्यात त्या गावातील २० टक्के सुद्धा शेतक-यांची नावे नाहीत.स्थगिती आणि चौकशी यापलिकडे हे सरकार जायला तयार नाही. जलयुक्त शिवार सारख्या योजना सुद्धा बंद केल्या जात आहेत. या सार्या योजना जनतेच्या मनातील आहेत, त्यामुळे ती सरकारला जाब विचारत आहे. मुंबईकर मेट्रोबाबत विचारणा करीत आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटाची घरे देण्याचे आश्वासन राहुल गांधीजी यांनी दिले होते. त्यांचाच पक्ष आणि हे सरकार तेही आश्वासन पाळायला नकार देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान भारतीय जनता पार्टी कधीच सहन करणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.