….तर कर्जमाफीला ४६० महिने लागतील : देवेंद्र फडणवीस

मुंबई नगरी टीम
मुंबई : कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने लोटले तरी केवळ १५ हजार शेतक-यांची यादी आली आहे,याच गतीने याद्या येत राहिल्या तर जितका डाटा अपलोड झाल्याची माहिती देण्यात येत आहे, ती यायला ४६० महिने अर्थात ३८-३९ वर्ष लागतील,असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

विधानसभेत आणि त्यानंतर बाहेर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,कर्जमाफीची जी पहिली यादी प्रसिद्ध झाली ती सुद्धा अपूर्ण आहे. शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील साखळी गावातील एकूण लोकसंख्या १८ हजार आहे. या गावात १८२१ शेतकरी आहेत आणि यादीत नावे आली आहेत फक्त १९३.राज्यातील सिंचन योजना,पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना २५ हजार, ५० हजार एवढेच नव्हे तर दीड लाख रुपये मदत देऊ, असे नेत्यांनी बांधावर जाऊन सांगितले. पण आज कोणतीही मदत न देता निव्वळ फसवणूक केली जात आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आज अतिशय गंभीर आहे. हिंगणघाटची घटना तर राज्याचे समाजमन सुन्न करणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सरकारने संवेदनशीलतेने यावर चर्चा करावी आणि कारवाई करावी,अशी फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली.

Previous articleकर्जमाफीवरून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ;दिवसभरासाठी कामकाज तहकूब
Next article“मंज़िले उनको मिली जो दौड़ में शामिल ना थे” ; फडणवीसांची शिवसेनेवर टीका