ऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा;त्यांना घरापर्यंत  पोहोचवा

मुंबई नगरी टीम

मुंबई : सध्याच्या गंभीर परिस्थितीत राज्यातील ऊसतोड कामगारांचे होत असलेले हाल पाहून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांनी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या सर्व ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे आपापल्या घराकडे पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

ऊसतोड कामगार हा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात स्थलांतरित होणारा कामगार आहे.संचारबंदी आणि लॅाकडाऊनच्या काळात सरकारने  सर्व नागरिकांना घरामध्ये थांबायला सांगितले आहे. ऊसतोड कामगार हा आपले घर सोडून समूहाने राहून ऊसतोडण्याचे व वाहतुकीचे काम करतात.  परंतु सध्याच्या परिस्थितीत मध्ये त्यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे सहानुभूतीने त्यांचा विचार करून त्यांच्याबद्दल निर्णय केला पाहीजे. संचारबंदी आणि लॅाकडाऊनच्या काळात  ऊसतोड कामगारांना सुद्धा सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे.त्यांचे राज्याच नेतृत्व करत असताना त्यांची काळजी घेत असतांना सर्वांना आवाहन करते की, तात्काळ त्यांच्याबद्दलचा निर्णय घ्यावा. मी हे अपील पूर्वी पण केले होते व देशासमोर आणि राज्यासमोर अत्यंत गंभीर आणि महत्वाचे प्रश्न होते, त्यामुळे या विषयात लक्ष घालणे बाबत विनंती केली होती.  परंतु सद्यस्थितीत हा विषय गंभीर बनला असून हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

कामगारांना जबरदस्तीने कारखान्याचे कर्मचारी दडपशाही करत आहेत, हे माणुसकीला धरून नाही.  महाराष्ट्रात असलेल्या कारखान्यांच्या तुलनेत खूप कमी कारखाने सध्या सुरू आहेत.त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जो ऊस शिल्लक आहे तो ऊस मशीनच्या साहाय्याने तोडणी करावा किंवा अन्य पर्यायाची चाचपणी कारखान्याने करावी. परंतु लॅाकडाऊच्या काळात ऊसतोड कामगारांना जबरदस्तीने काम करायला लावणे अत्यंत चूक आणि माणुसकीला धरून नाही.  त्यामुळे त्या ऊसतोड कामगारांचे गट करून त्यांची तिथेच तपासणी करून त्यांना वैद्यकिय सल्ल्यानुसार ७ ते ८ दिवस अलगीकरण करावे,व अलगिकरणाच्या काळात त्यांची जेवणाची व्यवस्था कारखान्यांनी करावी. अलगीकरणांच्या कालावधीनंतर त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यात यावे. दुर्दैवाने आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास सर्व कामगार आपापल्या घरी असतील. ऊसतोड कामगारांच्या घरी त्यांचे वयस्कर आई-वडील व लहान मुले निराधार पणे जीवन जगत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पाठविणे अपरिहार्य आहे.यासाठी आपण मदत करावी.राज्याचे आपण कुटुंब प्रमुख आहात या नितांत कष्टकरी वर्गावर आपण लक्ष द्यावे अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत  ऊसतोड कामगारांचे होणारे हाल पंकजा मुंडे यांनी राट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याही कानावर घातले आहेत. ऊसतोड कामगारांच्या लवादावर आपण लक्ष घालून साखर कारखान्याच्या अध्यक्षांशी चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा अशी विनंती त्यांनी पवार यांना पत्र पाठवून केली आहे.

Previous articleअन्यथा फार मोठे परिणाम भोगावे लागतील !
Next articleस्थलांतर करणा-यांना थांबवा; त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करा