मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यातील अ आणि ब वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के तर क वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे, तर या वेतन कपातीतून शासकीय डॅाक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि पोलीसांना वगळण्यात यावे अशी मागणी राज्याचे उत्त व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशात आणि राज्यात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठे आर्थिक आव्हान राज्यासमोर आहे. त्यामुळे आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यातील अ आणि ब वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के तर क वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. मात्र राज्यात सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रसंगी आपल्या परिवाराची काळजी आणि आपल्या जीवाची पर्वा न करता राज्यातील पोलीस, पोलीस अधिकारी,आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहे. त्यामुळे आज जाहीर करण्यात आलेल्या वेतन कपातीमधून या वर्गाला वगळण्यात यावे अशी मागणी मंत्री सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.