…आणि बीडकरांच्या मदतीला बारामतीकर धावले

मुंबई नगरी टीम

बीड : बीड जिल्ह्याच्या मदतीला पुन्हा एकदा बारामती धावून आली असून, जामखेडचे आमदार  रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला ६०० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती.

आज बारामती ऍग्रोच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे ६०० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर  मुंडे यांनी आ. रोहित  पवार व समस्त पवार कुटुंबियांचे आभार मानले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्स चा तुटवडा आहे. याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत. याबाबत माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता सामाजिक न्यायमंत्री मुंडेंनी बारामती ऍग्रो कडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला आ. पवारांनी लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला.

मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही आ. रोहित पवारांनी बारामती ऍग्रोच्या वतीने जिल्ह्यात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळ किंवा  विविध संकट काळात बारामती नेहमीच बीड जिल्ह्याच्या मदतीला धावून आलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता पुढच्या पिढीतील आ. रोहित पवार यांनीही ही परंपरा कायम राखली असून त्यांचे बीड जिल्हा वासीयांच्यावतीने आभार मानतो, अशा शब्दात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.

Previous articleआधी मुकाबला कोरोनाचा…मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Next articleकोरोना बाधितांची झपाट्याने वाढ; रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली