राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच झाली “कॅबिनेट”

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद होईल अशा प्रकारची पहिल्यांदात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही मोजकेच मंत्री उपस्थित होते.तर अन्य मंत्री आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ऐतिहासिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्यात आल्याने १७ मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक पार पडली.राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अनेक मंत्री आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी तळ ठोकून आहेत.त्यामुळे आज या बैठकीला वर्षा निवास्थानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  आरोग्यमंत्री राजेश टोपे, यांनी तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख,परिवहनमंत्री अनिल परब आदी मंत्र्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.तर अन्य मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला उपस्थित राहून जिल्ह्याची सध्यस्थिती मांडली.

बैठकीला उपस्थित असणा-या मंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेतली होती.मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी तोंडावर मास्क लावूनच या बैठकीत सहभागी होवून चर्चा केली. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीला येताना आपल्या सोबत आणलेले सॅनीटायझर प्रत्येक मंत्र्यांना देवून खबरदारी घेतली.एवढेच नव्हे तर या बैठकीत सामाजिक अंतराचे तत्वही पाळण्यात आल्याचे  बघायला मिळाले.या बैठकीला रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत,चंद्रपूरमधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पुण्यातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,शिक्षण राज्यमंत्री विश्वजीत कदम,अमरावतीमधून महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर,नांदेडमधून सार्वजिनक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,कोल्हापूर मधून गृहराज्यमंत्री ( शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ( ग्रामिण) शंभूराज देसाई आदी मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

आज  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थाकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करण्यात येवून पुढील तीन महिन्यांसाठी ५ रूपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी देण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यात सध्या असलेल्या कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

Previous articleधर्मगुरूंचे तबलिगींना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
Next articleविद्यार्थ्यांनो…आता घरी बसूनच अभ्यासक्रम पूर्ण करा !