मुंबई नगरी टीम
मुंबई : वांद्रयातील रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या मजुरांच्या गर्दीवरून आता राजकारण चांगलेच रंगलेले आहे.परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या फक्त वांद्रयावरूनच सुटत नाहीत.त्या लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. या गु-हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा ? हे मोठे षड्यंत्र आहे,त्यामागचे गौडबंगाल लोकांना समजले.पण आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू असा इशारा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या गर्दीवरून आता चांगलेच राजकीय वातावरण तप्त झाले आहे.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून सत्ताधा-यांवर धारेवर धरले असतानाच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
काय आहे आजच्या अग्रलेखात…
मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या फक्त वांद्रयावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे,नागपुरातूनही सुटतात;पण गर्दी जमा केली गेली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ.काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुहाळे चालवली गेली. या गुहाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हाकाय प्रकार म्हणायचा ? हे मोठे षड्यंत्र आहे. त्यामागचे गौडबंगाल लोकांना समजले. पण आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू. कोरोना संकटाची संधी साधून कोणी राजशकट खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या कपाळावर सरकारला खिळा ठोकावा लागेल.विरोधी पक्षाने इतक्या खाली घसरावे याचे आम्हाला दुख होत आहे!