मुंबई नगरी टीम
मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.हा लॉकडाऊन संपण्यासाठी केवळ सहा दिवस बाकी असतानाच देशात आणि राज्यातील कोरोना पूर्णत: अटोक्यात आणण्यात यश आलेले नाही.३ मे नंतर लॉकडाऊन मधून सूट द्यायची की अजून कडक करायचा याचे निर्णय राज्य सरकारांनी घ्यावेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या आहेत.सध्या राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
करोना व्हायरससाठी नेमलेल्या केंद्र सरकारच्या विशेष समितीने दिल्लीत येत्या १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतील सरकारनेही लॉकडाऊनचा कालावधी ३ मे नंतर पुढे आणखी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.सध्याची कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र, मध्य प्रदेश,पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिसा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाऊन वाढवण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे.ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन आधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत दिले असल्याने देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पंतप्रधान लवकरच याची घोषणा करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.राज्यातील ९२ टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई आणि पुण्यामध्ये आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.