“या” कारणास्तव प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोनाबाधीत  रूग्णांची सर्वांत जास्त संख्या मुंबईत असून,त्याची वाढ रोखण्यास  असमर्थ ठरत असल्याच्या आणि सत्ताधारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या नाराजीच्या कारणास्तव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केल्याची चर्चा आहे. प्रविण परदेशी यांच्यासह राज्यातील ८ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.तर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज ८ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली नगरविकास विभागाचे मुख्य सचिव (१)  म्हणून करण्यात आली आहे.परदेशी यांच्या तडकाफडकी बदली मागे अनेक कारणे असल्याची चर्चा आहे. परदेशी आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये बैठकीत नेहमी खटके उडायचे. राज्यात टाळेबंदी करून ४५ दिवसांचा अवधी अलटला तरी मुंबईतील कोरोनाचा वाढता आकडा रोखण्यात त्यांना अपयशी आले आहे.कोरोनाच्या परिस्थितीत निविदा प्रक्रियेवरूनही अतंर्गत गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा आहे.राज्य सरकारने उपाय योजना करताना अनेक निर्णय घेतले मात्र  काही निर्णयात स्वत:च्या अधिकारात त्यांनी फेरबदल केल्याने सत्ताधा-यांसह विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती.मंत्र्यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती.लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने दिलेली शिथीलता  परदेशी यांनी मुंबई करता रद्द करीत, अनावश्यक सुविधांची दुकाने खुली न करण्याचे आदेश काढले होते.मात्र याबाबत नाराजीचा सूर उमटताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा इलेक्ट्रॉनिक-हार्डवेअरची दुकाने खुली ठेवण्याचे आदेश काढण्यात आले.भाजी बाजारांबाबतचे नियोजन आणि आराखडे चुकले होते.महानगरपालिका प्रशासनाकडून नियोजनाची अंमलबजावणी कठोरपणे होत नव्हती.त्यामुळे अखेर परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

परदेशी यांच्यासह वरिष्ठ आठ सनदी अधिका-याच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), म्हणून करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव इक्बाल  चहल यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. अश्विनी भिडे नेमणूक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांचीही  नियुक्ती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त  आयुक्त आबासाहेब जराड यांची महसूल व वन विभागाचे ( मदत व पुनर्वसन ) सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांची  एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाचे सचिव के.डी. निंबाळकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा ; केवळ पदवीच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा होणार
Next articleराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १९ हजार ६३ वर पोहचली