मुंबई महापालिकेकडून लसीकरणात पक्षपातीपणा, मुंबईकरांना मोफत लस द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पहायला मिळत असून अनेक लसीकरण केंद्रावर ढिसाळ कारभार सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.महापालिकेने पारदर्शकपणे लसीकरण कार्यक्रम राबवावा व मुंबईकरांना मोफत लस मिळावी, यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या समवेत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,

आशिष शेलार, अतुल भातखळकर, राहुल नार्वेकर,भाजपा मनपा गट नेते प्रभाकर शिदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाठ, नगरसेवक विनोद मिश्रा यांचा समावेश होता.या भेटीनंतर दरेकर यांनी माध्यमासोबत संवाद साधला. त्यावेळी दरेकर म्हणाले,मुंबईत पारदर्शकपणे लसीकरण कार्यक्रम राबवणे गरजेचे असून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, असे निवेदन आम्ही आयुक्ताना दिले.ज्यामध्ये मुंबईतील ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा ज्यादा पुरवठा करण्याकरिता राज्य सरकारकडे आग्रह धरावा,१८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशा मागण्या आमच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.आयुक्तांनी शिष्टमंडळाला ग्लोबल टेंडर काढण्याचे आश्वासनही दिल्याचे दरेकर म्हणाले.

मुंबईकरांना मोफत लस मिळाली पाहिजे. केंद्र सरकारकडून मिळणारी लस त्याच घटकासाठी वापरली जावी. कारण अनेक केंद्रावर गोंधळ सुरू आहे, नागरिकांना योग्य त्या सुचना दिल्या जात नाहीत.आशिष शेलार, अतुल भातखळकर आणि आणखी काही मतदारसंघात लसीकरण केंद्र नाही.मुंबई महापालिकेकडून लसीकरणाच्या बाबतीत पक्षपातीपणा सुरु आहे”,असा आरोपही दरेकर यांनी केला.

Previous articleराज्य सरकारचा मोठा निर्णय: म्युकरमायकोसीसच्या रूग्णांवर होणार मोफत उपचार
Next articleनरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा,चिंता आणि चिता हे तीन ‘चि’ दिले !