मुंबई नगरी टीम
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.हर्षवर्धन जाधव यांनी आज समाज माध्यमावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.जाधव यांनी पत्नी संजना जाधव या आपल्या राजकीय उत्तराधिकारी असतील असेही यावेळी स्पष्ट केल्याने त्यांच्या पत्नी या भाजपकडून आपला राजकीय प्रवास सुरू करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेचे कन्नडचे माजी आमदार आणि सध्या मनसेत असणारे हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.जाधव यांनी आज समाज माध्यमाद्वारे याची घोषणा केली.सध्या राज्यात टाळेबंदी सुरु असल्याने या काळात सर्वजण वाचन आदी छंद जोपासत आहेत.टाळेबंदीत मी माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला असल्याने आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला यातून झाली आहे.त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.असे सांगतानाच, यापुढे माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल.यापुढे आपल्या ज्या समस्या, प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे.
राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे चर्चेत असणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आहेत.प्रत्येकाच्या घरात वाद होत असतात.मात्र याचा चुकीचा अर्थ लावू नका अशी विनंती करून,मी पत्नी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली संजना जाधव राजकारणात यशस्वी होतील, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.काही महिन्यापूर्वी जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या राजकारणात सक्रिय होणार असून, त्या भाजपकडून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात करणार असल्याची चर्चा आहे.