मुख्यमंत्री साहेब….आता बोलून नाही करुन दाखवा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधल्यानंतर भाजपने याला प्रत्युत्तर दिले आहे.आता बोलून नाही, करुन दाखवा, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच राज्य शासनाने मदतीचे पँकेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.शासकीय रुग्णालयात रुग्णांना जागा शिल्लक नाहीत, खाजगी रुग्णालये दाद देत नाहीत,खाटा उपलब्ध नाहीत,व्हेंटिलेटर नाहीत,नर्स, डाँक्टर नाहीत,रुग्णवाहिका मिळत नाहीत,म्हणून रुग्ण दगावत आहेत.रुग्णांचे हालहाल होत आहेत असे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात आहे. तर दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी, बलूतेदार, कामगार, मुंबईकर केंद्रा प्रमाणे राज्य शासनाकडून काही तरी मदतीची अपेक्षा करतो आहे. त्यामुळे तातडीने महाराष्ट्राने मदतीचे पँकेज जाहीर करावे.आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करणे अपेक्षित असताना पुन्हा महाराष्ट्राचा अपेक्षाभंग करीत आधी कोरोनाशी लढू मग पँकेज देणार असे जाहीर केले. कोरोनाशी लढतानाच एकाचवेळी सर्वच आघाडीवर काम करणे अपेक्षित असताना मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत शेलार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शेलार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री म्हणतात आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?” मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक ?आता बोलून नाही, करुन दाखवा!अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार,आणि मुंबईकर, करदाते ..यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का? हॉस्पिटल मध्ये रुग्णांना घेतले जात नाही..रुग्णवाहिका, खाटा नाहीत..निष्पाप जीव जात आहेत.आपल्या जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीसांचे पगार कापले जात आहेत. त्यांना पगार तरी द्या,  असे ही शेलार यांनी म्हटले आहे.

राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का ?काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही..म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारच!” कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करुन दाखवा!! एकदा म्हणता पावसाळ्या पुर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करु…आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार..एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत…आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत…मा.महोदय, रोज भाषण दिशा बदलतंय. आता बोलून नको, करुन दाखवा, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

Previous articleमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Next articleजपून पावले टाकत हळुहळु आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणायची आहे