मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार कोरोना अटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष असलेला भाजपने राजभनवाच्या वा-या करतानाच राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करीत सरकारवर प्रहार केला आहे.अशा दुहेरी आव्हानांचा मुकाबला करणारे राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.त्यांनी यावेळी आक्रमकपणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर चोफेर हल्ला चढविला.

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेवून राज्यातील सरकार कोरोनाचे संकट रोखण्यास असमर्थ ठरल्याची तक्रार करून राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडले होते.त्यांच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडाडून हल्ला केला आहे.काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केले नाही.मात्र या संकटात आज गोरगरीबांना अन्न मिळणे,त्यांना वैद्यकीय उपचार मिळणे हे महत्वाचे आहे.सरकारने गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिले.विविध राज्यातील ७ ते ८ लाख मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवले,राज्य सरकारने त्यासाठी ४८१ ट्रेन सोडल्या.यासाठी ८५ कोटी रुपये खर्च झाले.३ लाख ८० हजार मजूरांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले.यासाठी ७५ कोटी रुपये खर्च झाले.महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत राज्यातील शंभर टक्के जनतेला मदत झाली.यासाठी पॅकेज घोषित कशाला करत बसायचे,त्यांना  थेट मदत केली.असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या सर्व गोष्टी करताना कुठले पॅकेज घोषित करायचे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सध्या संकटाचा काळ आहे.त्यामुळे कोणी यामध्ये राजकारण करु नका.तुम्ही केले तरी आम्ही राजकारण करणार नाही.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पोकळ पॅकेज जाहीर करणारे सरकार नाही.आजवर लाखोंचे पॅकेज घोषित करण्यात आले,पण त्यातून काय साध्य झाले ? असा सवाल करीत,या अगोदर अनेक पॅकेज जाहीर करण्यात आली.आपल्याला वाटलं…वरती छान पॅकेज आत काय …पण उघडल्यावर रिकाम खोकं, अशा शब्दात त्यांनी पॅकेजची मागणी करणा-या भाजपवर हल्ला चढविला.राज्यातील जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.आमचे सरकार प्रामाणिकपणे चांगले काम करीत आहे.असे सांगतानाच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.सध्या केंद्राकडे जीएसटीचा पैसा अडकला आहे.अजून पैसे यायचा आहे.मग मी मारू  का बोंब.. राज्य सरकारचे पैसे केंद्राकडे अडकले आहेत…करू का..ठणठणाट..पीपीई किट येत नव्हते….मग बोंब मारू….माणूसकी मोठा धर्म आहे. सर्व जण या संकटात सहकार्य करीत असताना फक्त राजकारण म्हणून राजकारण करायाचे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही.असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Previous articleराज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४७ हजार १९० वर ; तुमच्या जिल्ह्यात किती ?
Next articleमुख्यमंत्री साहेब….आता बोलून नाही करुन दाखवा !