हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या ; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही.नागपूर,विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी,विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे,अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष,तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे,अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे.त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे.मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठववाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.

Previous articleनागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन केवळ १० दिवसच चालणार
Next articleम्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारली अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा