नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन केवळ १० दिवसच चालणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । नागपूर येथे होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर पर्यंत चालणार असल्याचे आज स्पष्ट झाले.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.अधिवेशनाचा कालावधी हा १२ दिवसांचा ठरविण्यात आला असला प्रत्यक्षात केवळ १० दिवसच कामकाज होईल.पहिल्या आठवड्यात शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असणार आहेत.विरोधकांकडे सत्ताधारा-यांना घेरण्यासाठी अनेक मुद्दे असल्याने कामकाजाच्या पहिल्या तीन दिवसात सभागृहात प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता असल्याने पहिले तीन दिवस कामकाज तहकूब होवू शकते.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन होवू शकले नाही.मात्र कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आल्याने यंदाचे नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन हे दोन आठवले चालणार आहे.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यसाठी आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील,बंदरे व खनिकर्म विकास मंत्री दादा भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी १९ ते ३० डिसेंबर पर्यंत ठरविण्यात आला.या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासंदर्भात २८ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे.या अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

Previous articleअखेर मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी मागितली जाहिर माफी ! वाद थांबविण्याची केली विनंती
Next articleहिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या ; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी