मुंबई नगरी टीम
पुणे : अनेक वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी पायी वारीची परंपरा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत होणार असली तरी आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यानुसार संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येणार आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव, सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार,विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे,वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्यसरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्रा पवार यांनी केले आहे. पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे.राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन,पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.