मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या संकटात सेवा देणा-या पोलीस अंगणवाडी सेविका आदींना मिळणा-या विमा कवचाचा लाभ आता राज्यातील सरपंचांना मिळणार आहे.२९ मे च्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सरपंचांच्या विमाकवचाबद्दल काहीही उल्लेख नव्हता.याची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली.
या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७ हजार ५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचांचा ५० लाख रुपयांचा विमा या माध्यमातून निघणार आहे. ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोना च्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे सामंत म्हणाले. सरपंचांच्या विमाकवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहेत असे सामंत यांनी सांगितले.