मुंबई नगरी टीम
नाशिक : वैद्यकीय परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले असून.अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे तर सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थी ज्या गावात राहतात किंवा विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत,त्या ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतल्या जातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.दोनच दिवसांपूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन वैद्यकीय परीक्षांना मंजूरी घेतली आहे. त्यानुसार वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अ.ग.पाठक यांनी अधिष्ठाता,प्राचार्य,परिसंस्था यांना पाठविलेल्या परिपत्रकात विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय परिषदांचे निर्देश आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी २०२० परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ( प्रथम वर्ष वैद्यकिय अभ्यासक्रम २०१९ वगळून) १५ जुलैपासून आयोजित करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने अभ्यासक्रमनिहाय प्रत्येक वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच टाकण्यात येणार आहे.परीक्षार्थी आणि महाविद्यालयाच्या सोयीसाठी सदर परीक्षा ह्या टप्प्या टप्प्याने व विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत त्या महाविद्यालयातच आयोजित करण्यात येणार आहेत.लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक गावानजीकच्या त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रावर ( त्या ठिकाणी केंद्र उपलब्ध असल्यास ) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र बदली देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विद्याशाखा व जिल्हानिहाय परीक्षाकेंद्रांची यादी लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करू दिली जाणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.