मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज तीन सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेसह,मीरा भाईंदर आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.
नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची चार महिन्यात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.जानेवारी महिन्यापर्यंत अभिजित बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते.मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर महिनाभर बांगर यांच्याकडे कोणतेही नियुक्ती देण्यात आली नव्हती.फेब्रुवारी मध्ये वस्त्रोद्योग संचालक म्हणून बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. चार महिन्यात पुन्हा बांगर यांच्याकडे आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सांभाळले होते, आता त्याच ठिकाणी बांगर यांची बदली झाली आहे.सध्या अण्णासाहेब मिसाळ हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी भाईंदर महानगरपालिका आयुक्त म्हणून डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विजय राठोड हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंतादा राजा दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ. संतोष रस्तोगी, जॉइंट सीपी (गुन्हे) यांची नियुक्ती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.