मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत,अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविध स्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. परंतु स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन व जीईएम सारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होते. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ३३ उत्कृष्ठ उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ॲमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ॲमेझॉनवर सध्या ३३ उत्पादने अपलोड केली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे पापड (८ प्रकार), पेपर बॅग (४ प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (४ प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (४ प्रकार), रेशमी ज्वेलरी (६ प्रकार), शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क (८ प्रकार) यांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटूंबातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यानुसार आजपर्यंत राज्यात ४.६२ लक्ष स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये ४६.७० लक्ष ग्रामीण कुटूंबांचा समावेश आहे. १९ हजार ६०६ ग्रामसंघ, ७९५ प्रभाग संघ, ८ हजार ४०५ उत्पादक गट तर १५ उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी व बिगर कृषी क्षेत्रात १४.४८ लक्ष कुटुंबानी आपल्या उपजीविकेचे किमान २ पेक्षा जास्त स्त्रोत विकसीत केले आहेत. माहे मे २०२० पासून एकूण रुपये २ लाख ०७ हजार ४५० इतक्या रकमेची विक्री झालेली आहे. अशाप्रकारे राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनमार्फत सध्या देशभर उपलब्ध असून लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतील.