चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी

मुंबई नगरी टीम

मुंबई : “महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकात पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखे बडबडत आहेत”, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे या टीकेचा खरपूस समाचार हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे.

हसन मुश्रीफ यांनी ट्वीट करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची आठवण करून देत चंद्रकांत पाटलांना सुनावले. “बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही”, असा टोला हसन मुश्रीफांनी हाणला. दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खुप छोटे नेते असल्याचे दिसून आले. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत, असे ते म्हणाले होते.

Previous articleसगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका : मुख्यमंत्री
Next articleअमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण,पहाटेच्या शपथविधीवरून संजय राऊतांची भाजपवर फटकेबाजी