मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या शनिवार ४ जुलै रोजी पनवेल व नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी येथील रुग्णालयांनाही भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.३० वाजता पनवेलमधील ठाणा नाका रोड येथील उप जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेबाबत पाहणी करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता पनवेल महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. दुपारी १२ वाजता नवी मुंबई वाशी सेक्टर १०-ए येथील नवी मुंबई महानगरपालिका म्युनिसिपल हॉस्पिटलला भेट देऊन उपलब्ध आरोग्य यंत्रणेबाबत आढावा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास वाशी रेल्वे स्टेशन नजीकच्या सिडको सेन्टर येथील कॉरंटाईन सेन्टरला भेट देऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वाजता सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका आयक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. यावेळी नवी मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.