पोलिस अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा ऑगस्टमध्ये घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह  परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. या वर्षासाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी दिली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.पोलिस उपअधीक्षक सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र )या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी, त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. सदरील परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र जुलै २०१३ नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८२ अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत.

 २२ मे च्या शासन निर्णयांन्वये पोलीस अधिकारी (निवडश्रेणी व उच्च श्रेणी) यांच्या विभागीय परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला. सदर परीक्षा आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Previous articleदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पनवेल,नवी मुंबईचा आढावा घेणार
Next articleतिजोरीत खडखडाट असतानाही शिक्षणमंत्र्यांसाठी २२ लाखांची कार !