मोठी बातमी : अखेर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अखेर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  आणि राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र बारावीच्या परीक्षा घेण्यावर शिक्षण विभाग ठाम होता.परंतु राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असतानाच बुधवारी झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.मात्र परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांसदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निर्णयासाठी कालच प्रस्ताव पाठविण्यात आला होता.आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.याबाबतची अधिकृत घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून,जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे असे गायकवाड यांनी  सांगितले.

Previous articleप्रसिद्ध गायिका वैशाली माडेंच्या हाती राष्ट्रवादीचे “घड्याळ”,सोपवली महत्वाची जबाबदारी
Next articleमाजी आमदाराची घरवापसी, धुळे जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश