शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असे समजताच शांत !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे.शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत अशा शब्दात पाटील यांनी शेट्टी यांना टोला लगवला आहे.

धारावीतील करोना नियंत्रणाचा श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणाऱ्या भाजपवाल्यांनी स्वयंसेवकांना नागपूर आणि उर्वरित महाराष्ट्रातही काम करायला लावावे,असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हाणला होता.शेट्टी यांच्यानंतर पाटील यांनी त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील यांनी ट्विट करून शेट्टी यांचा समाचार घेतला आहे.राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मूलभूत  खर्चही भागवणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही.दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहेत अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचे तुम्ही एकदा म्हटले होते. मात्र आता त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य ऐकायला मिळतनाही राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत,हे आम्हाला पाहायचं आहे.सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आली नाही, मग शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध काय वेगळ्या पद्धतीचं आहे का ? त्यात एवढी फारकत का ? राजू शेट्टी यांना आणखी एक गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे युरिया देखील कुठेच मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त असून संकटात सापडले आहेत. बांधावर जाऊन गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आता घरात बसून फेसबुक लाईव्ह करत आहेत. राजू शेट्टी जी तुम्हाला आमदारकी मिळणार असल्याचे कळले. मात्र आमदार झाल्यानंतरच तुम्ही शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्याल, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल आणि तोपर्यंत अगदी गप्प रहाल, असे वाटत आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत असा टोलाही पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

Previous articleमी कालही विद्यार्थ्यांसोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहणार !
Next articleठाकरे सरकार पाडण्यात रस नाही; फडणवीसांनी घेतली मोदी शहांची भेट