एसटी महामंडळातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून प्रवासी वाहतूक बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.ज्यांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाणार आहे.मात्र याबाबत कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. सध्या महामंडळात ५० पेक्षा जास्त वय असलेले २७ हजार कर्मचारी आहेत.

५० किंवा त्याहून अधिक वय असणा-या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मात्र याबाबत कोणावरही जबरदस्ती असणार नाही असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.आज झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याने वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेवून कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणी परब यांनी केली.राज्यातील कोरोनाची स्थिती, आरोग्याचा धोका या बाबी लक्षात घेत काही कामगारांनी स्वेच्छा निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. आपण आम्हाला स्वेच्छा निवृत्ती दिली तर आमची जाण्याची तयारी आहे, असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बैठकीत स्वेच्छा निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ५० पुढील वयाचे २७ हजार कर्मचारी आहेत त्यातील कितीजण या योजनेचा फायदा घेतात,ते पाहावे लागेल.या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून करायची हे ठरवण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले. आज मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

Previous articleनिवडणूक आयोगाकडून भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? : चव्हाणांचा गंभीर आरोप
Next articleशिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढा..अन्यथा ! : पंकजा मुंडेंचा इशारा