मुंबई नगरी टीम
बीड : कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा सध्या बंद आहेत,शिवाय सरकार सर्व व्यवहार ऑनलाईन करत आहे,मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईनच का ? हा घाट कुणासाठी घातला जातोय असा थेट सवाल करत याचा जाब विचारण्यासाठी तयार रहा असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मराठवाडयातील शिक्षकांशी संवाद साधताना केले.सरकारच्या ऑफलाईन बदलीच्या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या तमाम शिक्षकांना या आवाहनामुळे बळ मिळाले आहे.दरम्यान, मुंडे यांनी मंत्री असताना घेतलेल्या ऑनलाईन बदली धोरणाचे स्वागत करून उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी सरकारच्या ऑफलाईन धोरणाचा या संवादात तीव्र विरोध केला.
मराठवाडा शैक्षणिक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांच्या पुढाकाराने मराठवाडयातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लोक प्रतिनिधी यांच्याशी पंकजा मुंडे यांनी आज ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. सुरेश धस, आ. तानाजी मुटकूळे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. सौतोष दानवे, आ. मेघनाताई बोर्डीकर हे मराठवाडयातील आमदार तसेच माजी आमदार गोविंदराव केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.
शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडविण्याचे काम ते करतात,त्यामुळं त्यांना मनासारख्या नेमणूका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे असे त्या म्हणाल्या. आम्ही सरकारमध्ये असताना सचिव, सर्व संबंधित अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी या सर्वाना विश्वासात घेऊन ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला होता.ज्यामुळे सर्व सामान्य शिक्षक, ज्यांना कुणी वाली नव्हत, ज्यांचा कुठला वशीला नव्हता अशांना भ्रष्टाचारमुक्त धोरणाचा लाभ झाला परंतू विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय ? असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय हास्यापद असून ‘खाली डोकं वर पाय’ असा आहे असे त्या म्हणाल्या. बदल्या हया ऑनलाईनच असाव्यात अशी तमाम शिक्षकांची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वतः आग्रही आहे. माझे आजोबा तसेच मामा प्रमोद महाजन हे तर स्वतः शिक्षक होते आणि गुरू म्हणून माझे पिता मुंडे हे ही याच वातावरणात वाढले, त्यामुळे या लढाईत मी तुमच्यासोबत आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदन दिली आहेत. सरकारने बैठक बोलवावी हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा हा निर्णय बदलण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागेल असा इशारा मुंडे यांनी दिला.