…तरच सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल पुन्हा सुरु होणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्य नागरीकांची लाईफलाईन असलेली लोकल बंद असून,काही दिवसांपूर्वी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरीकांसाठी ही सेवा सुरू न केल्याने नाराज व्यक्त केली जात असतानाच मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईत लोकल सेवा केव्हा सुरू केली जाईल याबाबत मोठा खुलासा केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल सेवा बंद आहे.काही दिवसांपूर्वी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरीकांसाठी ही सेवा बंद आहे.मुंबई लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे,असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार याबाबत विचार करेल, हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही, असे  शेख यांनी स्पष्ट केले होते.मुंबईच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी राहतात.खाजगी कार्यालयामध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याची मुभा आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेची कार्यालयाकडून कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. बेस्टच्या अपुऱ्या बसेस, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल वाहतूक असल्याने बसेसना मोठी गर्दी होत आहे. गेल्या आठवड्यात नालासोपार परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा उद्रेक झाला होता. लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करत रेल्वे स्थानकावर जमलेले अनेक प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले होते.

सध्या मुंबईत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करण्यात येईल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केले आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या एक टक्क्यावर आली,तरच मुंबई अनलॉक होईल, असे चहल यांनी सांगितले. मुंबईसोबतच  उपनगरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या महानगर क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असेही  चहल म्हणाले.महानगरपालिका आयुक्तांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा लोकल प्रवास अजून दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous articleदूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीचे १ ऑगस्टला आंदोलन
Next articleठाकरे सरकार मधील अजून एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण