मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर रोज अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि वरिष्ठ वकील माजिद मेमन यांनी सुशांत जिवंत असताना जेवढा प्रकाश झोतात नव्हता तेवढा तो त्याच्या निधनानंतर आला असल्याचे विधान केले आहे.
माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरून यावर भाष्य केले. “सुशांत जिवंत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो त्याच्या निधनानंतर आला आहे. सध्या माध्यमांवर आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यापेक्षा अधिक त्याची चर्चा रंगली आहे.” असे मेमन यांनी म्हटले आहे. यांसंदर्भातील तीन ट्विट मेमन यांनी केले आहे. तसंच “कोणत्याही गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याबद्दलची माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते. कोणतीही माहिती सार्वजनिक केल्याने न्यायाच्या स्वारस्यावर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, माजिद मेमन यांच्या अशा वादग्रस्त विधानावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “माजिद मेमन यांनी ट्विटरवर केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हे तर, त्यांचे वैयक्तिक आहे. आमचा पक्ष त्यांच्या अशा कोणत्याही विधानाला पाठिंबा देत नाही किंवा समर्थन करत नाही. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, याची नोंद सर्वांनी घ्यावी”, असं नवाब मलिक यांनी म्हटले.