कसं काय पाटील बरं हाय का,दिल्लीत जे झालं ते खरं हाय का : मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

पैठण  । एक मंत्रालयात बसून काम करायला तर एक देवदर्शनाला जायला,असे राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याची असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.त्यांच्या टीकेचा समाचार पैठण मधिल सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेवून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

गणेशोत्सवातील दर्शनामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले होते.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेचा खरपूस समाचार आज पैठण येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.कसं काय पाटील बरं हाय का,दिल्लीत जे झालं ते खरं हाय का ? जयंतरावांनी अजित पवारांना बोलून दिले नाही.त्यामुळे अजित पवार निघून गेले.राज्यात त्यांना थांबवता येत नाही ,म्हणून त्यांना दिल्लीत थांबवलं अशा शब्दात दिल्लीतील अधिवेशनातील घडलेल्या प्रकारावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या सभेला,रोड शोला राष्ट्रवादीचे माणस पाठवली जातात.त्यामुळे अशा गर्दीची सवय शिवसेनेला नसल्याची टीका त्यांनी केली.शिंदे गटावर टीका करण्यासाठी सकाळ ,दुपार,संध्याकाळी त्यांना तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सामनातील रोखठोक वरून त्यांनी शिवसेना जाब विचारला.मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी त्यांनी जाहीर करावी असे सांगून,मुंबईतील मराठी माणूस विरार बदलापूर पर्यंत का गेला याचा विचार करायला हवा. सामनाच्या रोखठोक मध्ये याचे विश्लेषण करायला हवं,केवळ निवडणुकीसाठी मराठीचा मुद्दा पुढे करायचा मात्र निवडणुकीनंतर मराठी माणूस देशोधडीला का लागला याचाही विचार करायला हवा असा टोलाही त्यांनी लगावत विरोधकांच्या शब्दकोशात केवळ खोके आणि गद्दारी हे दोनच शब्द उरले आहेत.तुमच्या खोक्यांचा हिशोब आत्ता काढत नाही असा इशाराही त्यांनी दिला.आता जसे मुंबईतील घराघरात जाताय तंसे आधी केले असते तर मुंबईतील मराठी टक्का कमी झाला नसता केवळ मतांसाठी वापर करायचा आणि दुस-यांवर खापर फोडायचे ही जुनी पद्धत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे २०० आमदार निवडून येतील असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

Previous articleहे काय युपी बिहार आहे का ? रिव्हॉल्व्हर प्रकरणामुळे अजित पवार भडकले
Next articleमग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? उद्योगमंत्री उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना सवाल