हे काय युपी बिहार आहे का ? रिव्हॉल्व्हर प्रकरणामुळे अजित पवार भडकले

मुंबई नगरी टीम

मुंबई । पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना,मदतनीस,पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणे अपेक्षित असते त्यामुळे मी बोलणे टाळले असेही त्यांनी स्पष्ट केले.

पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना लेखी स्वरूपात पत्र काढत आदेश दिला गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाचे पत्रच विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.मंत्र्यांच्या निर्देशाशिवाय अधिकारी आदेश काढू शकत नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी दिल्लीतील अधिवेशनातील घडलेल्या प्रकाराबद्दल भाष्य केले.राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणे अपेक्षित असते त्यामुळे मी बोलणे टाळले असे स्पष्ट करतानाच माध्यमांनी नेहमीप्रमाणे याचा वेगळा अर्थ काढला. मला तिथे कुणी बोलू नका असे सांगितले नाही. मीच माझी भूमिका त्याठिकाणी घेतली.मी एकटाच बोललो नाही तर वेळेअभावी सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण बोलू शकले नाहीत.दोनवेळा प्रसाधनगृहात गेलो म्हणून वेगळा विषय चालवण्यात आला.कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला.याबाबत मुंबईत गेल्यावर माध्यमांसमोर बोलणार आहे असेही मी सांगितले होते.खासदार झाल्यापासून म्हणजे ३१ वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहतो परंतु मार्गदर्शन करत नाही राज्यात सभा, अधिवेशनात मी बोलतो माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न व राज्यसरकारची चुकीचे धोरणे मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे पवार यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे.यामुळे आमदारांची नाराजी वाढेल.शिवाय अजून पालकमंत्री नेमलेले नाहीत.पालकमंत्र्यांच्या यादीत इच्छूकांची संख्या जास्त असल्याने या नेमणूका रखडल्या आहेत. राज्यावर अनेक संकटे येत आहेत नुकतीच अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली आहे. धरणाचे पाणी सोडले जात आहे.त्यामुळे त्याखालील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कोण आहे.कुणावरतरी जबाबदारी नेमायला हवी होती. स्वातंत्र्यदिनी २० लोकांना झेंडावंदन करता आले इतर १६ ठिकाणी प्रशासकीय अधिका-यांनी झेंडावंदन केले हे लोकशाहीमध्ये मान्य होणारी गोष्ट नाही. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना नेमा परंतु जो काही कारभार सुरू आहे त्या कारभाराचा धिक्कार व निषेध पवार यांनी यावेळी केला. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला असताना ठाकरे व शिंदे गटात हाणामारी झाली.कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो,हे काय बिहार – युपी आहे का ? असा सवाल करतानाच मला या राज्यांची बदनामी करायची नाही.नाहीतर म्हणतील या राज्याची बदनामी करत आहे. परंतु एका सत्ताधारी पक्षाचा आमदार असे करायला लागला तर राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही ? गृहमंत्री काय करत आहेत ? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही.राज्याच्या हिताचे नाही असे खडेबोलही पवार यांनी सुनावले.

मध्यंतरी एका आमदाराने तंगड्या तोडण्याची भाषा केली होती त्यावेळी विधानसभेत या वर्तनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांना समज द्यावी असे सांगितले होते परंतु तरीसुद्धा तोच प्रकार सुरु आहे. हे काय चाललंय असा संतप्त सवालही पवार यांनी सरकारला केला. मी नास्तिक नाही परंतु राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्यालापण काही मर्यादा असतात.आपल्या राज्यात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतोय असे नाही असा टोला लगावतानाच मिरवणूका किती काळ चालवायच्या याला काही बंधने असावीत. आवाजाची मर्यादा नव्हती. ३६ तास मिरवणूका चालल्या याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.पितृपक्ष असल्याने ब-याच मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही.बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत.मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत.मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड कामाचा ताण असतो आणि त्यात देवदर्शन करुन आम्हाला गणपतीलाही जाऊन ते सगळे बघून फाईल काढायच्या आहेत आणि त्यात असे मेळावे कुठे कुठे घ्यायचे आहेत आणि गर्दी होत नाही म्हणून तिथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना गोळा करायचं असा उपरोधिक टोला लगावतानाच अरे हे काय चाललंय असा संतप्त सवालही पवार यांनी केला.

Previous articleपशुसंवर्धन विभागात बाह्यस्त्रोताद्वारे रिक्त पदे भरणार; लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई
Next articleकसं काय पाटील बरं हाय का,दिल्लीत जे झालं ते खरं हाय का : मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांवर निशाणा